किती दिवस हे गेले तरीही, पडे न अपुली गाठ,
कसा घडे हा खेळ नशिबी, होई न अपुली भेट...
काही कारण खरंतर नाही, अचानक पडतो कोलदांडा,
फोन बॉसचा कधी येई मजला, ड्युटी पडते कधी तुजला,
लहानसाच असा होई बदल,
कुणास ठाऊक कशास्तव,
कसा घडे हा खेळ नशिबी, होई न अपुली भेट...
आधीपासून ठरविलेले अपुले सगळे बेत,
मिसळून जाण्या आसुसलेले भेळेचे सामान,
मागच्यावेळी अर्ध्यात सुटला पत्यांचा तो डाव,
पडुनी राहील तसाच अजुनी असा एक सप्ताह,
होईल तरी का तेवा दर्शन,
पडेल का अपुली गाठ,
कसा घडे हा खेळ नशिबी, होई न अपुली भेट...
सांगायला लक्षात ठेवलेल्या त्या सगळ्या गोष्टी,
कुणी घातली कुणास टोपी अन त्या सतरा भानगडी,
शेअर करायच्या असतात काही खाजगी तुजसव बाबी.
मनातच कुजतिल अश्याच अजुनी एकटे दिवस काही,
मज नुरेल सांगता नंतर,
शिळ्या कढीला आणून ऊत,
कसा घडे हा खेळ नशिबी, होई न अपुली भेट...
दुसरे कुणी तुज भेटले मैतर, नवे गाडी अन नवेच राज्य,
मनात नाही खंत ही कसली, असलीच फक्त एक,
विसर पडेल का त्या नाव गोटात,
ओलावा वा उडुनी जाईल,
कसा घडे हा खेळ नशिबी, होई न अपुली भेट...
संगे तुमच्या कितीक केल्या त्या सगळ्या गुजगोष्टी,
किती घातला गोंधळ आणि कितीक चेष्टामस्करी,
आठवूनी ते उमटे हास्य,
विरहाश्रू डोळ्यांत,
कसा घडे हा खेळ नशिबी, होई न अपुली भेट...
आठवती मज दिवस जुने ते, तो कट्टा अन गप्पाटप्पा,
नाक्यावरचा गरम चहा अन गाडीवरच्या पानिपुर्या,
रात्र सगळी जागून आपण अभ्यास देखील केला होता,
केले साजरे वाढदिवस अन रडण्या हक्काचा खांदा,
कितिही असलो आपण दूर,
पुनर्भेटिची पक्की आस,
असा घडेल मग खेळ नशिबी, होईल अपुली भेट...!
No comments:
Post a Comment