पुसलेस सहज तू मज एकदा, 'सूर्य म्हणसी का चंद्र मला?'
प्रसन्न असशी कधी जेव्हा, हास्य विलसे तव नेत्री जेव्हा,
दिसता अशी तू सरे वेदना, अंधार कापत मित्रोदय जसा.
कधि तू सोज्वळ नाजुक बाला, उजळ मुख तव सुंदर काया,
गरम दुधाची साय जणू तू, कोजागिरीचा जणू चंद्रमा.
कधी तू असशी उग्र रागिट, दिसेल त्याला जाळुन टाकित,
ऊर्जित अशी तू दिपवी नयना, सूर्य जणू तो माध्यान्हीचा.
असता कधी तू दुःखीकष्टी, मलूल तू, इतरांची चलती,
नवजोमाने उडसी पुन्हा, अवसेनंतरची प्रतिपदा.
चंद्र असे तो औषधीकर्ता, सूर्य असे तो उर्जादाता,
चंद्र असे तो रात्रसखा, सूर्य असे तो सर्वाधारा.
सांग नेमके काय म्हणू मी? सूर्यही तू अन चंद्रमा तूची,
एकच फक्त हे ठाऊक मजला, जीवन अशक्य तुझ्याविना!