Welcome, friend...

Welcome to my Blog... As the name suggests, here are the records of my time as a sail the sea of dreams... Enjoy!!!

Tuesday, September 27, 2011

कविता करणे...

कविता करणे,
फारच सोपे असते...

शब्दांमधले सुप्त अर्थ शोधत शोधत,
आपल्याच मनाच्या जंगलातील,
विचारांच्या किल्ल्यातील,
राजकुमारी शोधत जायचे असते...
कविता करणे फारच सोपे असते...

वाटेमध्ये लागतात मग,
यमकांचे काटे, वृत्तांच्या जाळी,
अलंकारांचे खाच-खळगे,
पण हे जर अवघड वाटलेच,
तर मुक्तछंदांचे पंख लावून,
भरारी घ्यायची असते...
कविता करणे फारच सोपे असते...

हां, चुकते कधीतरी वाट पायाखालची,
एक काही सांगता सांगता,
दुसरेच होते ही कधीतरी,
या चुकल्या वाटेवरच्या यक्षांनाही
जिंकत जायचे असते...
कविता करणे फारच सोपे असते...

ध्येयावर लक्ष ठेवून
पुढे पुढे जायचे असते,
तर कधी गर्व गिळून, मागे वळून,
नवी वाट जोखायची असते,
अखेरीस कधी राजकन्या
फारशी सुंदर नसली,
तरी ती केवळ आणि
केवळ आपलीच असते...
कविता करणे फारच सोपे असते...

कविता करणे म्हणजे
प्रवाहाबरोबर वाहत जाणे असते,
कविता करणे म्हणजे
डोंगरावरून झोकून देणे असते,
अनादी काळापासून तुमच्या-माझ्यात असलेल्या शक्तीत
मिसळून जाणे असते...
कविता करणे फारच सोपे असते...

- कविता करणे फारच सोपे असते,
पण आपल्याच विचारांचा राजा बनणे मात्र कठीण असते...
कारण,

कारण ऐकावा लागतो त्यासाठी
एकवस्त्रा अबलेचा आक्रोश,
ऐकावा लागतो त्यासाठी
दुःखी क्रौंच पक्षिणीचा शोक,
ऐकावे लागते त्यासाठी
विरही यक्षाचे मन,
अन ऐकावे लागतात त्यासाठी
जसा राम, तसाच रावण,

समजावे लागतात,
आंधळ्यांचे रंग,
मुक्यांचे शब्द
अन बहिर्यांचे स्वर,
समजाव्या लागतात,
वीरांच्या गर्जना,
योद्ध्यांच्या प्रतिज्ञा,
अन हुतात्म्यांच्या समाध्या देखील..

बघाव्या लागतात,
हृदयामधल्या अव्यक्त भावना,
बघाव्या लागतात,
प्रेमाच्या घडत्या अन तुटत्या कथा देखील,

जाणीव व्हावी लागते,
सजीवांच्या अटळ शेवटाची,
अन जाणीव व्हावी लागते,
निर्जीवांतील जीवनदायी तत्वाची,

जाणीव व्हावी लागते,
सृष्टीच्या गूढ खेळाची,
अन जाणीव व्हावी लागते,
स्वतःतील देवदत्त देणगीची...

- असे सांगुनी मजला कुणीतरी कधीतरी फसविलेले,
आता कळते ज्यांस न उमगे त्यांचे भाष्य ते होते,
दडलेले सर्वांत असती सगळे गुण इथे गरजेचे,
जरासा धक्का देता मधले द्वार ते सहजी उघडे,
खुल्या मग होती तुम्हा सगळ्या दशदिशा भरारी घेण्या,
बंध न उरतो कुठलाही मग कल्पनांच्या उड्डाणा,
हा प्रवाह आहे खळाळता,निर्मळ, मुक्तिदायी गंगेचा,
शिखरे अशी कि खुजा भासतो हिमालयाचा माथा...

कधीतरी या एकदा
अन द्या स्वतःला झोकून,
नाहीच जमले तर सांगा
कुणालातरी 'दे ढकलून'..
वेशीवरती उभ्या तुम्ही
केवळ एक पाऊल टाकायचे असते,
कविता करणे फारच सोपे असते...

सांगून गेलेत महात्मे की
सगळ्यांत शक्ती एकच असते,
कागदावरती लेखणीतून तिला
छोटीशी वाट हवी असते,
या एकदातरी वेचायला इथे
गुलबकावलीची फुले,
खरच सांगतो, कविता करणे
फारच सोपे असते...