Welcome, friend...

Welcome to my Blog... As the name suggests, here are the records of my time as a sail the sea of dreams... Enjoy!!!

Saturday, July 24, 2010

खूप केला विचार मी, जरि न उरला अर्थ काही,
सांगायचे गेले राहून, वेळच नाही जमुनी आली,
विचार माझे विसरू कसा मी,
सरला सुगंध विसरू कसा मी,
चुरगळलेल्या गुलाबाचा, रंग मनातला विसरू कसा मी?

प्रयत्न कितीदा केले गे मी, गूज मनीचे सांगण्यासाठी,
हसलो नंतर कितीदा गे मी, त्या फसलेल्या वेळेवरती,
हसू चेहऱ्यावर माझेच माझ्या,
त्या झालेल्या गोंधळावरती,
दुःख न झालेल्या धैर्याचे, सांग परंतु विसरू कसा मी?

वाटले होते तूच मनातली, तूच अप्सरा ग स्वप्नातली,
तूच अर्थ ग मज जगण्याचा, तूच एकली आशा माझी,
खरेतर असेच आहे अजुनी,
वाटतेस मजला अजुन हवीशी,
सत्य भासली स्वप्ने सगळी, सांग मला ती विसरू कशी मी?

जगणे आहे वाहते पाणी, एका डोही थांबत नाही,
कितिही गहिरा डोह तो असला, भुरळ मनावर टिकत नाही,
असेच व्हावे माझ्याबद्दल,
आशा धरुनी वाहत राही,
पुढच्या सपाटी पसरून देईन, गाळ मनातला अश्रुंतुनी!

होईन का मी मग रिकामा? का जाईन उडुनी वार्यावरती?
मिळेल मजला का मार्ग वाहता? प्रश्न गौण हे खरोखरी!
तुजसाठी मी सोडेन रस्ता,
चढून जाईन कसली चढाई,
तुला नकोशी साथ जरि माझी, शपथ घेतली विसरू कसा मी?

Monday, July 12, 2010

आठवण

आठवण येते कधी कुणाची, भलत्या जागी, भलत्या वेळी,
का होते हे कुणी सांगावे, न कळे कोणा काही!

मंद सुगंध कधी चाफ्याचा,
येई विहरत वार्यावरुनी,
क्षणात नेई तुजपाशी तो,
का होते हे कुणी जाणावे न कळे कोणा काही!

अवचित घन ते नभ आक्रमिती,
शमविती तृष्णा या धरतीची,
शीतल जल मज कुशीत घेता,
थंडावा तो देई मज उब, अंकुर मनी उमलवी!

भेटे कधी तो जुना मैतर,
कुशल पुसे तो मजला सहजच,
देतो सांगून येईल माही ते,
आतून मन हे भूतकाली अन दुःखाश्रू हे नयनी!

सरते न कधी तुझी आठवण,
असलो जरि मी कोठेही ग,
तू न जाणसी माझी व्यथा ही,
प्रेम परंतु सदैव तुजवर, कधी न अंतर देईन मी!

आठवण येते कधी तुझी गे, भलत्या जागी भलत्या वेळी,
कुणी सांगावे का, कसे हे? झुरणे नशिबी तुझ्याचसाठी!