गुपित सांगतो तुला सखे मी, ऐक देऊनी कान,
प्रेम माझे स्वार्थी तुजवर, प्रेम माझे स्वार्थी ग!
वाटे तुज मी ओवाळून टाकीन तुजवर जीव,
तुला वाटतो तितका स्वस्त नसे कुणाचा प्राण,
कलियुग आहे हे प्रिये ग, किती भाबडी तू ग!
प्रेम माझे स्वार्थी तुजवर, प्रेम माझे स्वार्थी ग!
दिला तुला मी रोज गुलाब, कधी न चुकलो यात,
किती काढले रुसवे-फुगवे, किती सोसला राग,
तुला वाटते केले मी हे सगळे मोबदल्यावीण!
प्रेम माझे स्वार्थी तुजवर, प्रेम माझे स्वार्थी ग!
रागावलीस तू सखे मजवर, बरोबर म्हणाही आहे तुज,
कधी न मला तू ओळखलेस, फशी पडलीस मम डावास ग,
फसवणार्याने फसणाऱ्याला फसवत राहण्याचा नियम!
प्रेम माझे स्वार्थी तुजवर, प्रेम माझे स्वार्थी ग!
आणि सांगतो तुला मी सखे, वसुली माझी असते चोख,
कधी न घेतला कमी मोबदला, जेवढ्यास तेवढा नेहमी ग,
तूच कधी उदार होऊनी दिलेस मजला भरपूर ग!
प्रेम माझे स्वार्थी तुजवर, प्रेम माझे स्वार्थी ग!
वेडा होतो मग मी तेवा, धडधडते हे हृदय ग,
अश्याच सुंदर क्षणांत माझं, गुंतला आहे जीव,
हसू तुझे ग किती हे मोहक, किती असे अनमोल!
प्रेम माझे स्वार्थी तुजवर, प्रेम माझे स्वार्थी ग!
आनंद तुझा मोबदला माझं, हाच असे ग छंद,
इतिकर्तव्यच या जगण्याचे आहे तुझेच सुख,
तुझ्यावरून मी जरि न टाकला ओवाळून मी प्राण,
कुणी न काढती मोहरीनेच मोहरीचीच दृष्ट,
तुझा माझं जीव सखे ग, तूच पंचप्राण,
तूच एकली दिशा जीवनी, तूच फक्त प्रकाश,
नसता तू मग सांग कोठे आहे मम अस्तित्व?
प्रेम माझे स्वार्थी तुजवर, प्रेम माझे स्वार्थी ग!