तिन्हीसांजा व्हायच्या आत घरी परतायचे वय सरले,
हातपाय धुवून देवापुढे परवचा म्हणायचे वय सरले,
लवकर जेऊन दहाच्या आत झोपण्याचेही वय सरले,
केवळ अर्धवट गृहपाठाच्याच चिंतेचेही वय सरले,
संध्याकाळी दोन-तीन तास खेळण्याचेही वय सरले,
खोडी केल्यावर खरपूस मार खाण्याचेही वय सरले,
केवळ कुणी बघितल्यावरती समाधान वाटणारे वय सरले,
रोज मित्रांना भेटण्याचे अन भांडण्याचेही वय सरले,
आता असतात घडाभर चिंता, दडपणे आणिक शंका,
रोजची कटकट, राजकारण अन एकटेपणा मनातला,
मित्र कुठले, कुठल्या मैत्रिणी, घरच्यांसही दुर्मिळ दिसण्या,
शिट्टी झाली, गोळी सुटली, आता उर फुटेस्तो धावा,
कधी मिळाला वेळ मोकळा, अन मागे वळून बघता,
कधीच तुंबल्या नदीसारखा रंग मनाचा काळा,
अंतर्मुख कधी होऊ म्हणता, रिकामेच दिसते सगळे,
सांगू कुणा रे, विश्वास असण्याचेही वय सरले,
निर्व्याज, निष्पाप, निस्वार्थी आता प्रेम ही देखील नसते,
गाडी, शिक्षण, घरासाठीच्या कर्जाचे अवघड ओझे,
चिंता हरण्यासाठी जावे तर मोजा आधी पैसे,
खरे असते खोटे असते वा नसते ते ही विकणे,
पहिलाच घाव तो पडतो कचकन नीतीवरती इसापाच्या,
कोल्हे सगळे, ससे ही सगळे, रंग बदलते सरडे,
किर्र काळोख्या वनात जगणे, क्षणाक्षणाला झगडा,
माणूस म्हणवून घेण्यासाठी, स्वत्व कुठेतरी जपण्या...
No comments:
Post a Comment