चंद्र कधी तुज सूर्य कधी मी, म्हणे फूल वा कधी तारका,
नदी खळाळती, शीतळ साउली, लखलखती वा जशी ती उल्का,
अंधारातली मशाल किंवा वाटेवरची पाणपोई,
घार भरारी घेती किंवा मुलुखमैदानी तोफ कधी,
कधी सुगंधी रातराणी वा कधी तू रंगीत गुलमोहोर,
कधी कडाडती वीज कधी वा वार्याची तू संथ झुळूक,
आषाढसरी तू, श्रावणसरी तू, खेळकर सरी तू हस्ताच्या,
थंडी गुलाबी, पुरणपोळी वा, भरदार मोहोर आंब्याचा,
चित्र असे तू माझ्या मनीचे, चित्रकार तू मम स्वप्नांची,
संगीत माझ्या हृदयाचे तू, बासरी जणू तू कृष्णाची,
बरेच अजुनी राहीन बोलत, अशक्य वर्णन सौंदर्याचे,
एव्हढेच म्हणतो, खरेच केवळ, अनुपमेय सौंदर्य तुझे...
No comments:
Post a Comment